सोलापूर बाजार समितीच्या प्रशासकपदावरून
मोहन निंबाळकर यांची उचलबांगडी ; पदभार दिला या अधिकाऱ्याकडे
सोलापूर :- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर नियमबाह्यपणे प्रशासकपदावर नियुक्त झालेल्या मोहन निंबाळकर यांची अखेर उचलबांगडी झाली असून त्यांच्या जागी सोलापूरच्या सहकारी संस्थेचे सोलापूर शहर उपनिबंधक डाॅ.प्रगती बागल यांच्याकडे प्रशासकपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.अशी माहिती राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस डाॅ.बसवराज बगले यांनी दिली.
पुणे येथे पणन विभागाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असलेल्या मोहन निंबाळकर यांच्या नियुक्तीला हरकत घेऊन त्यांनी केलेल्या नियमबाह्य कामकाजाबद्दल राष्ट्रवादीचे दक्षिण सोलापूरचे नेते डाॅ.बसवराज बगले यांनी पणन मंत्री आणि प्रधान सचिंवाकडे पुराव्यासह तक्रारी केल्या होत्या, त्यावर पणन संचालकांचा खुलासा सरकारने मागविला होता.शिवाय जिल्हा उपनिबंधकांच्या परस्पर पत्रव्यवहार करून बेकायदेशीर कामकाजाचा सपाटा लावल्याने त्यांच्याविषयी जिल्हा उपनिबंधकांनी सुध्दा सात पानी आरोपांचा अहवाल सादर केला होता.
डाॅ.बगले यांच्या आरोपात तथ्य असल्यामुळे सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी प्रशासक निंबाळकर यांना तात्काळ काढून टाकण्याचे आदेश पणन संचालक रसाळ यांना दिले होते.त्यानुसार निंबाळकर यांना सोलापूर बाजार समितीच्या प्रशासक पदावरून तडकाफडकी हटविण्यात आले आहे.पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी आज 5 मार्च रोजी आदेश काढून निंबाळकर यांना कार्यमुक्त केलेले आहे.
प्रशासक पदावर असणाऱ्या व्यक्तीला त्या संस्थेच्या कामकाजाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना मोहन निंबाळकर यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या परस्पर पणन संचालकांशी संगनमत करून बेकायदेशीर कामकाज केले. अनुकंपा तत्वावरील नोकरभरती,तोलारांना परवाने देणे,व्यापाऱ्यांना त्रास देऊन आर्थिक लूट करणे,गरज नसतांना कोट्यवधी रूपयांचे टेंडर काढून कमिशन घेणे,प्रक्रिया विभागातील व्यापाऱ्यांना इतर व्यवसायास मुभा देणे,स्वच्छता,वजनकाटा आणि पहारेकरी नेमणुक आणि रस्ता दुरुस्तीच्या निविदा काढून आर्थिक गैरव्यवहार करणे अशा विविध कामकाजाबाबत डाॅ.बगले यांनी तक्रारी केल्या होत्या,त्याची सत्यता सिध्द झाल्यामुळे प्रशासक पदावरून निंबाळकर यांना हटविण्यात आले आहे.याशिवाय त्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे