क्या बात है ! या पठ्ठ्याचा सलग सोळाव्यांदा ‘नेट/सेट’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचा अनोखा विक्रम!
बार्शी : येथील श्री शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विषयात सहाय्यक पदावर कार्यरत असणारे डॉ. राहुल भगवान पालके हे विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत हिंदी विषयात नेट( राष्ट्रीय पात्रता चाचणी) उत्तीर्ण झालेले आहेत. विशेष म्हणजे ते नेट/ सेट ही परीक्षा यावेळेस १६ व्यांदा उत्तीर्ण झालेले आहेत.
या परीक्षेस हिंदी विषयासाठी ६०३६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी ४४०४७ उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी ४४०४७ उमेदवार बसलेले होते.या परीक्षेत डॉ . पालके यांना एकूण १६० गुण प्राप्त झाले असून पर्सेंटाईल स्कोर ७७.२६ असा आहे. अगोदर ते या परीक्षा इंग्रजीत ११ वेळा, मराठीत २ वेळा, वुमेन स्टडीज व अर्थशास्त्र या विषयांत प्रत्येकी १ वेळा उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांच्या या यशात यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालयाचा सिंहाचा वाटा आहे.
मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेत नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. त्यांना साहित्याबद्दल विशेष रुची असून त्यांची कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनावरील काव्यसंग्रह व समीक्षात्मक चरित्रग्रंथाचे प्रकाशन झालेले आहे.त्यांच्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव, उपाध्यक्ष श्री. नंदनजी जगदाळे, सचिव श्री. पी.टी. पाटील, उपसचिव श्री.ए.पी.देबडवार, खजिनदार श्री.जयकुमार शितोळे, प्राचार्य डॉ. ए.बी.शेख, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. समाधान पवार, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.