जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना बालस्नेही
पुरस्कार जाहीर ; यासाठी दिला जातो पुरस्कार
छत्रपती संभाजीनगर,दि.२४(जिमाका)- महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बालस्नेही पुरस्कारासाठी निवड झाली असे आयोगाच्या अध्यक्ष ॲड.सुशीबेन शाह यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे.
उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकनात छत्रपती संभाजीनगर विभागातून निवड करण्यात आल्याचेही कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीएन बालस्नेही पुरस्कार २०२४ साठी उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकनात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निवड झाली आहे.सोमवार दि.३ मार्च रोजी दुपारी एक वा. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांना निमंत्रणही आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,राज्यमंत्री योगेश कदम, मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बालकांच्या हक्कांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीत राबविलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेमुळे त्यांची ह्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
शाळा बाह्य मुलांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणणे, वीट भट्ट्यांवरील कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपाययोजना करणे, बालकामगारांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोज्ना राबविणे, कुपोषण निर्मूलनासाठी दत्तक बालश्रेणी वर्धन योजना राबवून त्यात कुपोषित बालकांचे पालकत्व देण्यात आले. त्यात ४८०० बालकांचे श्रेणीवर्धन झाले.
माझे मुल माझी जबाबदारी हे अभियान राबवून मुलांच्या आरोग्याच्या सातबारा तयार केला. याशिवाय आता जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व सर्वांगिण विकासासाठी त्यांनी दशसूत्री सारखा उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची बालस्नेही पुरस्कारासाठी निवड झाली आहे.