संजयमामा शिंदे यांच्याकडून लिंगराज परिवारांचे सांत्वन ; मामांनी दिला आठवणींना उजाळा
सोलापूर : जिल्हा परिषदेचे सहाय्यक प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज यांच्या अपघाती निधनानंतर जिल्हा परिषद आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. लिंगराज परिवाराचे विविध स्तरातून सांत्वन होत आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी गुरुवारी लष्कर परिसरातील लिंगराज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
लिंगराज यांच्या कुटुंबीयांना धीर देत मी कायम तुमच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली. मी माढा पंचायत समितीचा सभापती झाल्यापासून माझी आणि विवेक लिंगराज यांची ओळख आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष आणि अध्यक्ष झाल्यानंतर लिंगराज यांचे काम पाहिले आहे. पदाधिकारी, प्रशासन आणि कर्मचारी यांची सांगड घालून काम करणारा जिल्हा परिषदेचा कामगार नेता म्हणून लिंगराज यांची ओळख होती. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा, प्रसंगी पदाधिकारी आणि प्रशासनाशी भांडणारा एक चांगला मित्र आम्ही गमावलो याचे दुःख वाटते असे सांगत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.