रिपाइं आठवले गटाचा सोलापुरात मोर्चा ; परभणी घटनेचा निषेध ; फक्त आंबेडकरी समाजच का?
सोलापूर : परभणी येथील संविधान विटंबना घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल मोर्चा काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून निघालेला हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिर, पासपोर्ट कार्यालय, सिद्धेश्वर प्रशालेमार्गे जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आला या ठिकाणी पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष अतुल नागटिळक यांनी याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान संपूर्ण देशाचे असताना त्या संविधानाच्या रक्षणासाठी केवळ आंबेडकरी समाजात रस्त्यावर उतरतो हे दुर्दैव आहे असे सांगतानाच घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधित आरोपींना शिक्षा व्हावी अन्यथा रिपाइ यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला.
परभणी घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत समाजातून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहे सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त जिल्हा परिषदेच्या समोर लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले.