दोस्त असावा तर असा ; ‘गुरु आला दादा’साठी ; देवेंद्र कोठे 15000 हून अधिक मताधिक्याने विजयाचा दावा
सोलापूर : राजकारणात मैत्रीचे अनेक किस्से आहेत. सोलापुरात ही अशीच मैत्री या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली. ही मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर आणि भारतीय जनता पार्टीचे शहर मध्य विधानसभेचे उमेदवार देवेंद्र कोठे यांची. मित्रासाठी कोणतीही आशा, अपेक्षा न ठेवता गुरुशांत यांनी या निवडणुकीत कोठे यांना सहकार्य केले आहे.
या निवडणुकीत देवेंद्र कोठे हे सुमारे 15000 हून अधिक मताधिक्याने विजयी होतील असा दावा धुत्तरगावकर यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांनी केलेले काम त्याची पावती म्हणून त्यांना शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत विरोधात शिवसेना नसल्याने मतांची विभागणी झाली नाही. हिंदुत्ववादी आणि कोठे यांना मानणारी मते मोठ्या प्रमाणात मिळाली असल्याचे गुरुशांत यांनी सांगितले.
यंदा मोची समाजाने काँग्रेसला नाकारून भाजपला मतदान केले, ती मते भाजपला बोनस आहेत तसेच रामवाडी सेटलमेंट या भागातील मते मोठ्या प्रमाणात भाजपला मिळाली आहेत त्यामुळे काँग्रेस, एमआयएम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांचे सर्व अंदाज फेल होतील आणि देवेंद्र कोठे हे किमान 20 हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास धुत्तरगावकर यांना आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत धुत्तरगावकर हे शिवसेनेचे नगरसेवक होते. त्यावेळी महेश कोठे यांनी बंडखोरी करत मध्य मध्ये निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीचा गुरुशांत यांना चांगला अनुभव आहे. कुठे मध्ये मिळतात, कुठे मिळत नाहीत याचा त्यांनी अभ्यास केला असून त्याचा निश्चित फायदा देवेंद्र कोठे यांना या निवडणुकीत झाला.
तसे पाहायला गेले तर नगरसेवक झाल्यानंतरच गुरुशांत धुत्तरगावकर आणि देवेंद्र कोठे यांची मैत्री झाली, मैत्रीला जपणारा, शब्दाला जगणारा, विकासाचे ध्येय असणारा देवेंद्र कोठे माणूस आहे. त्यामुळेच कोणतीही अपेक्षा न करता आपण त्यांना या निवडणुकीत सहकार्य केल्याचे गुरु दादांनी सांगितले.