स्वाभिमानी लिंगायत समाजाच्या लढाईसाठी दक्षिणच्या मैदानात ; श्रीशैल मामा हत्तुरे सोमवारी भरणार अर्ज
सोलापूर : सोलापूरच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आता चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीप माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, मनसेचे महादेव कोगणूरे, परिवर्तन आघाडीचे उमेदवार युवराज राठोड, वंचितचे संतोष पवार, अपक्ष सोमनाथ वैद्य या नेत्यांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.
आता या सर्वांमध्ये आणखी एक चेहरा समावेश होणार असून तो म्हणजे लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते श्रीशैल मामा हत्तुरे यांचा.
मामा हे दक्षिण मतदार संघामध्ये कायमच चर्चेचा विषय राहिले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीला हत्तुरे मामा इच्छुक होते परंतु त्यावेळेस काही राजकीय समीकरणांमुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. परंतु यंदा २०२४ ला ते काही ही करून विधानसभा लढवण्यावर ठाम आहेत. 28 ऑक्टोबर सोमवारी ते आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळाली. यामुळे निश्चितच विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी ते कायमच लढत आलेले आहेत. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमातून आपला ठसा उमटवला आहे.
दक्षिणच्या रणांगणात श्रीशैल मामा हत्तुरे हे थांबले तर दक्षिण परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून एकच उमेदवार राहण्याची शक्यता आहे. लिंगायत समाजाचा बडा नेता या मैदानात उतरत असल्याने ही निवडणूक आणखीच रंगतदार ठरली या शंका नाही.