शहर मध्य भाजपलाच; देवेंद्र कोठे की राम सातपुते? बार्शीत राजेंद्र राऊत यांनी खेळली माईंड गेम
सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना उबाठा, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झाले आहेत परंतु अजूनही काँग्रेस पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या याद्या जाहीर झाल्या नाहीत.
सोलापूर जिल्ह्यात सर्वांचे लक्ष लागलेल्या आणि काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या सोलापूर शहर मध्य हा मतदार संघ शिवसेना ऐवजी भारतीय जनता पार्टीला सुटल्याची अधिकृत माहिती सूत्रांकडून मिळाली. आता या मतदारसंघात देवेंद्र कोठे की आमदार राम सातपुते हे निवडणूक लढवणार हे आज स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात मिळालेल्या मतानंतर भाजपने हा मतदार संघ शिवसेनेकडून सोडवण्यात यश मिळवले असल्याचे बोलले जाते.
शहर मध्य ऐवजी बार्शी हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला आहे. बार्शी मध्ये अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मात्र चांगलीच माइंड गेम खेळली आहे. या मतदारसंघात त्यांचे राजकीय विरोधक दिलीप सोपल यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत हे आज शिवसेनेत प्रवेश करणार असून शिवसेनेच्या धनुष्य बाणवर ते बार्शी मध्ये उभारणार असल्याचे समोर आले आहे. मुळात बार्शी हा मतदार संघ शिवसेनेचा कट्टर मानला जातो त्यामुळे मशाल आणि धनुष्यबाणात लढत होण्याची शक्यता आहे.