जिल्हाध्यक्ष धवलसिंह बसणार पुन्हा खुर्चीवर ; शहराध्यक्ष नरोटे यांनी मात्र काँग्रेस भवनाकडे फिरवले तोंड
सोलापूर : मारहाण प्रकरणात अडचणीत आलेले काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांची जामीन झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धवलसिंह यांना जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. गुरुवारी दुपारी काँग्रेस भवन मध्ये मोहिते पाटील चार्ज घेतील.
लोकसभा निवडणुकीदरम्यान धवलसिंह मोहिते पाटील हे मारहाण प्रकरणात भूमिगत असल्याने त्यांचा तात्पुरता चार्ज मंगळवेढ्याचे ज्येष्ठ नेते एडवोकेट नंदकुमार पवार यांना कार्याध्यक्ष पद देऊन त्यांच्याकडे पक्षाने दिला होता.
आता या प्रकरणात मोहिते पाटील यांना जामीन झाल्याने आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाना पटोले यांनी त्यांना अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे धवलसिंहांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
एकीकडे जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे घेत असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी मागील चार ते पाच दिवसांपासून काँग्रेस भवनाकडे तोंड फिरवले असल्याची चर्चा आहे. काँग्रेस भवनामध्ये कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता ते चार दिवस आलेच नाहीत असे सांगण्यात आले.
चेतन नरोटे हे शहर मध्य या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यांच्या नावाची शिफारस ही पक्षाकडे झाल्याचे बोलले जात होते परंतु ऐनवेळी काँग्रेसने माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे खात्रीलायक वृत्त असल्याने नरोटे हे नाराज असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांमधून चर्चा ऐकण्यास मिळत आहे.