सोलापूरच्या शहर उत्तर मध्ये प्रशांत इंगळे ‘मनसे’ मालकांना देणार टक्कर
सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहीर झाली. त्यामध्ये सोलापूर शहर उत्तर साठी राज ठाकरे यांचे निष्ठावंत, विश्वासू आणि कट्टर समर्थक मानले जाणारे प्रशांत इंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षातून नाराज होऊन मनसेमध्ये प्रवेश केलेले महादेव कोगनुरे यांना दक्षिणची उमेदवारी जाहीर झाली आहे.
प्रशांत इंगळे हे जोशी समाजातील असून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केल्यापासून ते त्यांच्यासोबत आहेत. सोलापुरातील मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून इंगळे यांच्याकडे पाहिले जाते. या निष्ठेचे फळ म्हणून राज यांनी इंगळे यांना ‘शहर उत्तर’ची उमेदवारी दिली आहे.
प्रशांत इंगळे यांच्या उमेदवारीने शहर उत्तर या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. इंगळे यांचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशी अतिशय चांगले संबंध असल्याचे पाहायला मिळते. पण आता विधानसभेचा या रणांगणात विजय मालकांना प्रशांत इंगळे यांचा सामना करावा लागणार आहे. राज ठाकरे यांनी जर सोलापुरात आपली सभा घेतली तर निश्चितच शहरातील मतदारसंघांमध्ये चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही.