सोलापुरात पत्रकारांनी महायुतीच्या नेत्यांना घेतलं फैलावर ; विकासाच्या मुद्द्यावर महायुती लढणार ; ‘महिला सशक्तीकरण’ची सर्वाधिक मार्केटिंग
सोलापूर : राज्यातील महायुती मधील पक्ष भाजप, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि रयत क्रांती संघटना या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. काम हीच महायुतीची ओळख असल्याचे सांगत आपले रिपोर्ट कार्ड सादर केले यात सर्वाधिक मार्केटिंग हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी शिवसेना सचिव संजय मशिलकर, भाजप अध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पवार, शिवसेना शहर प्रमुख मनोज शेजवाळ, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, भाजप नेते मनिष देशमुख, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष जुबेर बागवान, अनंत जाधव, वैभव गंगणे, प्रमोद भोसले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्नांची बरसात केली, लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर प्रश्न उपस्थित केले, या निवडणुकीत महायुती एकत्र कुठे दिसली, राष्ट्रवादी बारामती आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे ठाण्यात प्रचाराला दिसले मग ही कसली महायुती? सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघ कसे ठरले याबद्दल प्रश्न उपस्थित झाले, विशेष करून शहर मध्य या मतदारसंघावर फोकस करण्यात आला. हा मतदारसंघ भाजप की शिवसेना घेणार? पण पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते पक्ष सोडत आहेत याचा फटका बसेल का? असे प्रश्न विचारले असता कार्यकर्ते पक्ष सोडून जाणे दुःखद आहे, नेते गेले पण जनता महायुती सोबत आहे त्यामुळे फरक पडणार नाही असे उत्तर नरेंद्र काळे यांनी दिले.