ब्रेकिंग ! सोलापूर बाजार समितीसाठी १० नोव्हेंबरला मतदान ? सात ते अकरा ऑक्टोबर अर्ज भरणा
सोलापूर : महाराष्ट्र राज्यात दोन नंबरची बाजार समिती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर लागली असल्याची खात्रीशीर माहिती सहकार विभागातील सूत्रांकडून मिळाली.
याबाबत दोन दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे घोषित होणार आहे. सात ते 11 ऑक्टोबर दरम्यान अर्ज स्वीकृती होणार आहे आणि 10 नोव्हेंबरला मतदान आणि 11 नोव्हेंबर रोजी मतमोजणी अशी प्रक्रिया राहील असे समजले आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चा संचालक म्हणजे मिनी आमदार समजला जातो. या बाजार समितीवर कायम काँग्रेसची सत्ता राहिली आहे. मागील काही टर्म माजी दिलीप माने यांचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले. आता दक्षिण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले दिलीप माने व काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे या दोन्ही नेत्यांचा सहकार क्षेत्रात दबदबा आहे. हे दोन्ही नेते विधानसभेसाठी इच्छुक असून आता सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक सिद्धेश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी हे इच्छुक होऊन तयारी करीत आहेत. पण या बाजार समिती निवडणुकीसाठी माने हसापुरे एकत्र झाले तर काँग्रेसकडे एक हाती बाजार समितीची सत्ता येईल असे बोलले जाते.
या दोन्ही नेत्यांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवली तर निश्चितच या दोघांपैकी एक जण आमदार आणि दुसरा बाजार समितीचा सभापती होईल यात शंका नाही.
मागच्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला होता. त्यामुळे ती निवडणूक चांगलीच गाजली. तरीही त्यावेळी सुभाष देशमुख यांच्या पॅनलचा पराभव झाला होता. आता या निवडणुकीत सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.