क्या बात है ! भारत निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या विधानसभा नियोजनाचे कौतुक
सोलापूर, दिनांक 30(जिमाका):- राज्यात विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा झाला. मुंबई येथे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या व आचारसंहिता लागल्यानंतर करावयाच्या तयारीचा आढावा निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी घेतला. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महिला मतदान नोंदणी व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर यासाठी केलेल्या तयारी व नियोजनाची दखल घेऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातही सोलापूर प्रमाणे नियोजन करावे असे सुचित केले.
सोलापूरचे जिल्हाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या कामकाजात स्वतः लक्ष घालून मतदानाची टक्केवारी वाढवणे व सर्व मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी अत्यंत कुशलतेने सामाजिक जाणीव ठेवून पूर्वतयारी व नियोजन करत असल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी कौतुक केले.
*महिला मतदान नोंदणी:-
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ज्या गावात महिला मतदान नोंदणी कमी आहे जेंडर रेशो 927 पेक्षा अशा ठिकाणी तलाठी , ग्रामसेवक, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका महिला बचत गट यांचे मार्फत शिबिरे घेतली. नवीन विवाह झालेल्या महिलांची गावात नोंद करून घेण्यासाठी ही नियोजन करण्यात आलेले आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार , नायब तहसीलदार संबंधित मतदान केंद्रावर भेटी देऊन जास्तीत जास्त महिलांची मतदार म्हणून नोंदणी होण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मतदार यादी चा जनरल रेशो 931 वरून 948 पर्यंत वाढण्यास मदत झालेली आहे.
ग्राम सुरक्षा यंत्रणा:-
मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी आकडेवारी येते ज्या गावात आणि मतदान केंद्रावर जिथे मतदान कमी असेल त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी स्वतः ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत मतदान करण्यासाठी फोन कॉल करून आठवण करून देणार आहेत. तसेच तलाठी ग्रामसेवक BLO मार्फत प्रत्यक्ष मतदार यांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक गावाच्या व्हाट्सअप ग्रुप वर मतदान करण्यासाठी मेसेज करण्यात येणार आहेत.
महिला मतदारांची नोंदणी व ग्राम सुरक्षा यंत्रणा मार्फत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी केलेल्या नियोजनाची दखल मुख्य निवडणूक आयुक्त यांनी घेतली. या कामासह अन्य निवडणुकीच्या अनुषंगाने कामकाजात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद लक्ष घालत असल्याने नियोजन चांगल्या प्रकारे झालेले आहे. प्रारंभी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा निवडणूक प्रशासनाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या विविध कामाचे सादरीकरण आयोगासमोर सादर केले.