सोलापूर, दिनांक 15(जिमाका):- राज्य शासनाने 4 ऑक्टोबर 2023 रोजी पालकमंत्री पदाची अतिरिक्त यादी जाहीर केल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदी उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची नियुक्ती केली. त्यानंतर आज प्रथमच त्यांचे सोलापूर शहरात आगमन झाले.
सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी आज सायंकाळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद हुतात्मा किसन सारडा, मलाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले व महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन केले. यावेळी नरेंद्र काळे, मोहन डांगरे, विक्रम देशमुख हे पदाधिकारी उपस्थित होते.
शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुस्तक भेट देऊन स्वागत केले. तर महापालिका आयुक्त शितल उगले तेली व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख व आमदार समाधान आवताडे तसेच मान्यवर व्यक्ती यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व पदाधिकारी यांची निवेदने स्वीकारली
शासकीय विश्राम येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या अडचणी बाबत निवेदन दिले, त्या निवेदनावर संबंधित विभागाकडून तात्काळ कार्यवाही होऊन आपले काम मार्गी लागेल असे श्री. पाटील यांनी दिव्यांग व्यक्तींना आश्वासित केले. त्याप्रमाणेच ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अन्य नागरिकांचे व पदाधिकाऱ्यांचे निवेदने स्वीकारून त्यावर प्रशासनाकडून उचित कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सोमवारी सकाळच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीला ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर नवरात्र महोत्सव निमित्त सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेऊन पुढील कामकाजास सुरुवात केली.