सोलापूर विमानतळाला ‘DGCA’चे मिळाले लायसन्स
सोलापूर, दिनांक 25:- नागरी विमान वाहतूक महासंचालनालय(DGCA) चे दिनांक 11 व 12 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळाची पाहणी व तपासणी करून गेले होते. यामध्ये विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणाली द्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी डीजीसीए कडून करण्यात आलेली होती. विमान वाहतूक सुरू करण्याच्या अनुषंगाने असलेली सर्व मानके सोलापूर विमानतळ प्राधिकरण कडून पूर्ण करण्यात आलेली असल्यामुळे आज डीजीसीए कडून सोलापूर विमानतळावरून विमान उडणे व उतरण्याचे परवाना (लायसन्स) मंजूर झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
तत्पूर्वी ब्युरो ऑफ सिविल एव्हिजन सिक्युरिटी (नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो) च्या अधिकाऱ्यांनी होटगी रोड सोलापूर विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली. विमानतळ प्राधिकरण कडून सुरक्षेच्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी चे अधिकारी तपासणीसाठी आलेले होते. त्यांची तपासणी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम विमानतळाच्या विविध सुरक्षा मानके याबाबत तपासणी करण्यासाठी आली होती. तपासण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डीजीसीए कडून सोलापूर विमानतळाला आज विमान लँड होणे को टेकऑफ करण्याची लायसन्स प्राप्त झालेले आहे. त्यामुळे सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.