राष्ट्रवादीच्या महेश मानेंना लॉटरी ; स्वतः शरद पवारांनी दिली संमती
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस तथा प्रवक्ते पदावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील महेश माने यांची शरद पवार यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या उपस्थितीत गोविंदबाग बारामती येथे निवड करण्यात आली. यावेळी माढा विधानसभेचे नेते संजय कोकाटे, मोहोळ तालुका अध्यक्ष विनय पाटील, माढा तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे माढा तालुका अध्यक्ष ऋषिकेश बोबडे, वडाळा ग्रामपंचायत सदस्य मनोज साठे आदी उपस्थित होते.
मागील काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या एक कार्यक्रमात महेश माने यांनी निष्ठावंतांचा मुद्दा उपस्थित करत नवीन आलेल्या लोकांना दिल्या जाणाऱ्या पदाबद्दल प्रश्न उपस्थित करत वाद घातला होता. त्यावेळी त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे पक्षातून निलंबन व्हावे यासाठी एक गट सक्रिय होता. झालेल्या वादाबद्दल आणि होत असलेल्या अन्यायाबद्दल महेश माने यांनी युवा आमदार रोहित पवार तसेच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली, मुंबई, पुणे तसेच बारामती येथे भेट घेऊन माहिती दिली होती.
पक्षात सक्रिय असलेले आणि निष्ठेने काम करणाऱ्या लोकांनी महेश माने यांची पुन्हा नियुक्ती व्हावी यासाठी खा.शरद पवार, आ..रोहित पवार, खा.सुप्रिया सुळे तसेच आ.जयंत पाटील यांच्याकडे फिल्डिंग लावली होती. त्याचाच भाग म्हणून बारामती येथे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांची भेट घेतली असता शरद पवारांनी महेश मानेंची तात्काळ निवड करण्याचे आदेश जिल्हाध्यक्ष बळीराम साठे याना दिले. त्यावेळी काका साठेंनी निवडीचे पत्र दिले.
महेश माने यांचे काम मी गेली अनेक वर्षे पाहत आहे. ते त्यांचे काम निष्ठेने आणि चोखपणे करतात. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात संघटनेचं काम उत्तम केलं आहे.त्यांच्याकडून घडलेला प्रकार हा उद्विग्नतेतून घडला याची मला जाणीव आहे. शिवाय त्यांनी त्याबद्दल माफी मागितली त्यामुळे त्याविषयीची चर्चा पुन्हा नको. काका साठेंच्या सोबतीला माने सारखे लोक असल्यावर काकांना देखील मदत होते. त्यांचे अधिकार कमी न करता आणि त्यांना कामाचं स्वातंत्र्य देत आहे. महेश तुम्ही पण पूर्वीसारखे सक्रिय राहून तुमचे काम करा. पक्षाच्या आणि माझ्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला नक्की न्याय मिळेल असे शरद पवार यांनी या निवडीच्या वेळी सांगितले.