महायुतीच्या मांदियाळीत फुटली वैद्य – राठोड जोडीची दहीहंडी ! राम सातपुतेंनी पाळला मैत्री धर्म ! सोमनाथ वैद्य यांनी वेधले लक्ष
सोलापूर : सोलापुरात प्रथमच स्वयं शिक्षा फाउंडेशन आणि सोनाई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आगामी विधानसभेच्या तोंडावर सोनाई फाऊंडेशनचे युवराज जाधव आणि स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे सोमनाथ वैद्य या जोडीने ही दहीहंडी घेऊन हजारो युवकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. या दहीहंडी उत्सवाला महायुतीच्या नेत्यांनी उपस्थिती लावल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
या दहीहंडी उत्सवासाठी आमदार विजयकुमार देशमुख व आमदार राम सातपुते यांच्या हस्ते उत्सवाच्या उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना बोलवण्यात आले होते.
परंतु विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी व शहाजी पवार यांची या कार्यक्रमाला अनुपस्थिती होती. आमदार राम सातपुते यांनी हजेरी लावून आपला मैत्री धर्म पाळला. लोकसभेच्या दरम्यान युवराज राठोड यांनी राम सातपुते यांना पाठिंबा दिला होता तसेच सोमनाथ वैद्य हे मंत्रालयात असल्याने त्यांची पहिल्यापासूनच सातपुते यांच्याशी चांगली ओळख आहे त्यामुळे सातपुते यांनी हजेरी लावून उपस्थितांमध्ये चैतन्य वाढवले.
या कार्यक्रमाला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन जाधव, अक्कलकोटचे जन्मेजय भोसले, शिवसेना शिंदे गटाचे अण्णासाहेब सत्तूबर, भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, सचिन चव्हाण, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, अनिल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी मागील दोन महिन्यांपासून सोमनाथ वैद्य हे मोर्चे बांधणी करत आहेत अनेक सामाजिक उपक्रमातून त्यांनी दक्षिणच्या जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे. या भव्य अशा दहीहंडी उत्सवातून वैद्य यांची आता युवकांमध्ये ही चांगले ओळख झाल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाला माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या समर्थकांची उपस्थिती ही चर्चेचा विषय ठरत आहे.