काँग्रेसच्या या नेत्याला दक्षिणसाठी जनसुराज्य पक्षाची विचारणा ; आणखी एक लिंगायत नेता कोरेंना भेटल्याची चर्चा
सोलापूर : कोल्हापूरच्या वारणा येथील माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाने यंदा सोलापूर मध्ये विधानसभा निवडणुकीत चाचणी सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यात लिंगायत मतदान असलेल्या मतदार संघात त्यांनी उमेदवारांची शोध सुरू केली असून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी जनसुराज्य पक्षाने काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, लिंगायत नेते विजयकुमार हत्तूरे यांना फोनवरून विचारणा झाल्याची माहिती समोर आली आहे.
विजयकुमार हत्तूरे यांनी लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नांवर अनेक आंदोलने केली, मोर्चा काढला, विविध स्तरावर मेळाव्या घेतले आहेत. त्यामुळे हत्तूरे यांना याप्रकरणी विचारणा झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी हत्तुरे यांना विचारले असता त्यांनी याला दुजोरा दिला. पण आपण कोणताही निर्णय कळविला नाही असे हत्तुरे यांनी सांगितले.
दरम्यान काँग्रेस पक्षात काँग्रेस पक्षामध्ये दक्षिणमधून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उमेदवारी मिळते का नाही या टेन्शनमध्येही नेते पाहायला मिळत आहेत. याच इच्छुक नेत्यांपैकी एका लिंगायत नेत्यांने सुद्धा विनय कोरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याचे चर्चा आहे. परंतु कोरे यांची व्यवस्थित भेट झाली नाही असेही काँग्रेसच्या सूत्रांकडून समजले.