सोलापूरच्या पर्यटनाचा होणार झपाट्याने विकास ; 282 कोटींची उच्चाधिकार समितीकडून मंजुरी ; जिल्हाधिकाऱ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक
सोलापूर, दिनांक 21(जिमाका):- सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल तसेच येथून होणारे स्थलांतर ही थांबेल. त्यामुळे उजनी जल पर्यटन 190 कोटी 19 लाख, कृषी पर्यटन 19 कोटी 30 लाख, विनयार्ड पर्यटन 48 कोटी 26 लाख, धार्मिक पर्यटन 25 कोटी असा एकूण 282.75 कोटीचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीकडे सादर केला. व समितीकडून या आराखड्यासाठी 282.75 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीमध्ये प्रथम सादर करण्यात आला. जिल्ह्याच्या पर्यटनाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या बाबी यात नमूद करून त्यासाठी लागणारी तरतूद करून हा आराखडा समितीने मंजूर केला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता प्रदान केली. तर माहे जून 2024 मध्ये पुणे येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याकडे हा पर्यटन आराखडा सादर केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री महोदय यांनी या आराखड्याला तत्वत: मंजुरी दिलेली होती.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेला हा आराखडा उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात आला. आज मुंबई येथे राज्याच्या मा.मुख्य सचिव श्रीमती सुनिता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने या आराखड्यातील बाबींचे बारकाईने माहिती घेऊन यातील 282.75 कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी प्रदान केली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याचे उच्चाधिकार समितीसमोर पीपीटीद्वारे सादरीकरण केले. हे सादरीकरण करत असताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती तसेच पर्यटनासाठी खूप महत्त्वपूर्ण जिल्हा असल्याची माहिती देऊन हा आराखडा मंजूर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढण्यास मदत होईल. तसेच, येथून होणारे स्थलांतर रोखले जाईल यासाठी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा असल्याचे समितीला जिल्हाधिकारी यांनी पटवून दिले.
*राज्यासाठी पथ दर्शक प्रकल्प-
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उच्चाधिकार समिती समोर सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याचे ज्या पद्धतीने सादरीकरण केले. तसेच, या आराखड्यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनाच्या दृष्टीने अंतर्भूत केलेल्या बाबी किती महत्त्वपूर्ण आहेत याची जाणीव समितीला झाली. आराखड्याची मांडणी व सादरीकरणाबद्दल उच्चाधिकार समितीच्या अध्यक्ष तथा मुख्य सचिव व अन्य सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे विशेष कौतुक केले. तसेच, हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शक असेल असेही समितीने सांगितले. या बैठकीसाठी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी उपस्थित होते.
*एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प
जिल्ह्यात संपूर्ण जगातील पर्यटकांना जल, कृषी, विनयार्ड व धार्मिक पर्यटनाचा अनुभव देणे हा या एकात्मिक पर्यटन प्रकल्पाचा आत्मा व यु. एस. पी. देखील आहे. यासाठी प्रकल्पातून जिल्ह्यात एकात्मिक पर्यटन सर्किट विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने जिल्ह्यात वेगवेगळी पथदर्शी उदाहरणे (कृषी पर्यटन, कृषी मॉल, जल पर्यटन ई बाबतची मॉडेल्स) उभी राहतील की, जी पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील उद्योजकांना पर्यटन क्षेत्रातील विविध संधी दर्शवतील व यासारखे उपक्रम एक व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रेरणा देतील. यामुळे जिल्ह्यात पुढील 8-10 वर्षात पर्यटन उद्योगात मोठी आर्थिक गुंतवणूक होऊन विकासाची प्रकिया वेग धरेल व एकंदरीत स्थानिक व जिल्ह्यावासियांचे जीवनमान उंचावेल.
एकात्मिक पर्यटन सर्किटमध्ये उजनी धरणातील जल पर्यटन हे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण असेल. पर्यटकांना यासोबतच येथे धरणाच्या जलाशयाचा भाग, सभोवतालील निसर्गरम्य परिसर, जल क्रीडा उपक्रम, विविध देशी तसेच विदेशी पक्षी, ईत्यादीचे नैसर्गिक सौंदर्य न्याहाळता येईल. पुढे सर्किट मध्ये परिसरातील कृषी पर्यटन केंद्रे, धार्मिक स्थळे, विनयार्ड पर्यटन, तलाव, किल्ले, वारसा स्थळे यांना भेटी देता येतील. पर्यटकांना साधारणत: आठवडाभर पर्यटन सर्किटमध्ये असलेल्या विविध स्थळांना (जल, धार्मिक, कृषी, नैसर्गिक विनयार्ड पर्यटन स्थळांना) भेटी देऊन पर्यटनाचा आस्वाद घेता येणार आहे. निश्चितच यामुळे स्थानिक पातळीवर पर्यटन पूरक उद्योग वाढतील, मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल व यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होऊन जिल्ह्याची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढण्यासाठी गती मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग उभे राहण्यास चालना मिळेल व त्यामुळे टूर गाइड, हॉटेल आणि रिसॉर्ट कर्मचारी, अन्न आणि पेय सेवा कर्मचारी, ट्रॅव्हल एजंट, वाहतूक सेवा (बस, कार, टॅक्सी) सुविधा देणारे, विविध कार्यक्रमांचे नियोजन करणारे, मनोरंजनाचे कार्यक्रम करणारे कलाकार / लोक कलाकार, दुकानदार व किरकोळ वस्तू विक्रेते, संग्रहालय आणि वारसा साइट कर्मचारी, संवर्धन कामगार, ग्राहक सेवा प्रतिनिधी, बांधकाम व देखभाल दुरुस्ती कामगार, स्पा आणि वेलनेस कर्मचारी, स्वच्छता सेवा सुविधा देणारे कामगार यांचेसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.