नेहरू युवा केंद्राच्या सोलापूर कार्यालयात दारूच्या बाटल्या आणि ग्लासांचा खच आढळून आला. भाजपा सोलापूर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे आणि भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य यतिराज होनमाने यांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक माहिती उघड आणली आहे.
या कार्यालयातील शिपाई सुभाष चव्हाण याचा नेहरू युवा केंद्राच्या मुख्य सभागृहातच दारूचा अड्डा मांडला होता. त्याचा परदापाश भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवाधिकारी अजित कुमार यांच्या समोरच सुभाष चव्हाण हा रोज दारू पित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
जिल्हा अधिकारी अजित कुमार आणि शिपाई सुभाष चव्हाण यांचे निलंबन करण्याची भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी मागणी केली होती. दरम्यान विकास वाघमारे आणि यतिराज होनमाने यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिले. नेहरू युवा केंद्राच्या कारभाराची मागील 20 वर्षापासूनची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद हे गंभीर झाले असून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.