सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी सुमित भोसले यांना पक्षाने तडकाफडकी निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीने हे पत्र काढले असून या पत्रावर प्रदेश युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांची सही असून त्यांच्यासोबतच या पत्रावर प्रदेश युवा काँग्रेसचे इन्चार्ज मितेंद्र सिंग, प्रदीप सिंधव, विजयसिंह राजू यांच्या सह्या आहेत.
प्रदेश युवा काँग्रेस कमिटीने सुमित भोसले यांना दिलेल्या पत्रात,
आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत की, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तुमची गेल्या एक वर्षातील कामगिरी आणि पक्षावरील निष्ठा या आधारावर तुम्हाला निलंबित करत आहे. जसे की, तुम्ही माझा गाव, माझी शाखा या सर्वात महत्वाच्या चालू मिशनमध्ये सहभागी होण्यात आणि तुमच्या असेंब्लीमध्ये IYC आणि MPYC कार्यक्रम आयोजित करण्यात अयशस्वी झाला. गेल्या काही महिन्यांत, तुम्ही कोणत्याही राज्य किंवा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थित राहिला नाही आणि भारत जोडो यात्रेतील तुमचे योगदानही समाधानकारक नाही.
यामुळे आपण पक्ष संघटनेच्या शिस्तीचा भंग केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तुम्ही पक्षाप्रती काम करत असल्याच्या आधारावर MPYC तुम्हाला निलंबित करत आहे.
पक्षाने जरी हे पत्र काढून कारणे दिली असली तरी सुमित भोसले हे विधान परिषदेचे उमेदवार सत्यजित तांबे यांचे कट्टर समर्थक असून काँग्रेसने तांबे यांची पक्षातून हकालपट्टी केली असतानाही भोसले यांनी तांबे यांचे समर्थन केले आहे. त्याचाही फटका भोसले यांना बसल्याची शक्यता नाकारता येत नाही.