“सोलापूरकरांनों, परत माझे नाव मतदार यादीत नाही असे ओरडू नका” ; वाचा ही महत्त्वाची बातमी
सोलापूर, दि. 26 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2024 या अर्हता दिनाकांवर आधारित छायाचित्र मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 25 जून 2024 ते 24 जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याद्वारे घरोघरी भेटी देवून तपासणी, पडताळणी, योग्य प्रकारे फोटो तसेच मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी 25 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच 25 जुलै ते 9 ऑगस्ट 2024 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या काळातील शनिवार, रविवारी दावे व हरकती स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत 19 ऑगस्ट 2024 पर्यंत राहणार असून 20 ऑगस्ट 2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियत, 2021 अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. तदनुषंगाने मतदान नोंदणी नियम, 1960 मध्ये देखील सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार चार अर्हता दिनांक 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे व त्यावरील सर्व नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी .
सदर चार अर्हता दिनांकावर 18 वर्षे पुर्ण झालेल्या व त्यावरील सर्व नागरिकांनी www.voters.ecl.gov.in व voter helpline App (VHA) च्या माध्यमाने नांदणी करावा. मतदार यादीमध्ये आपले नांव आहे कि कसे हे शोधण्यासाठी www.electorasearch.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच आपल्या क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा दुरध्वनी क्रमांक 1950 यावरती संपर्क साधावा
जिल्ह्यातील नागरीकांनी आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आपली नांवे, फोटो, पत्ता व इतर बाबी मतदार यादीमध्ये तपासून घ्यावीत. ज्यांची दुरूस्ती असतील त्यांनी दुरूस्ती करून घ्यावी व ज्यां नागरिकांची नांवे मतदार यादीमध्ये नाहीतच अशा सर्व नागरिकांनी ऑनलाईन, बीएलओ व मतदार नोंदणी कार्यालय या ठिकाणी जाऊन आपली नांवे मतदार यादीत नोंदवून घ्यावीत. असे आवाहन जिल्हाधिकारी, कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.