बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार ; डीडीआर ; सहकारी संस्था निवडणुकीचा नवा निर्णय, कोणत्या निवडणुका होणार
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असून सहकारी संस्था निवडणुकीचा आलेल्या आदेशाशी कोणताही संबंध नाही बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार अशी माहिती जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिली.
येत्या जुलै महिन्यात बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपते. त्यामुळे 20 जून ते 24 जुलै 2024 दरम्यान प्रारूप आणि अंतिम मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राज्यात झालेला पाऊस त्यामुळे सुरू असलेल्या पेरण्या आणि पुढील काळात दाखविण्यात आलेला पाऊस यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका या 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचा सहकार विभागाचा आदेश निघाला होता. या आदेशाचा आणि बाजार समितीच्या निवडणूकीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले. बाजार समितीची निवडणूक ही पणन विभागाशी संबंधित असते असेही त्यांनी सांगितले.
सोलापूर उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या तसेच निवडणुकीच्या टप्प्यावरील असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे शुद्धिपत्रक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणतर्फे काढण्यात आले आहे.
सहकारी संस्थांच्या घोषित केलेल्या निवडणुका पावसाळ्यामुळे पुढे ढकलण्यात आल्याचे परिपत्रक यापूर्वी काढण्यात आले होते. त्यामुळे अनेक सहकारी संस्थांची निवडणूक सुरू असलेली हालचाल मंदावली होती. पण राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने पुन्हा शुद्धिपत्रक जारी केले आहे.
निवडणुकीच्या टप्पा व न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू करण्याच्या प्रक्रिया सुरूच राहतील असे या शुद्धी पत्रकात नमूद करण्यात आल्यामुळे निवडणुकीच्या टप्प्यावर असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका वेळापत्रकानुसार होणार आहेत. त्यामुळे निवडणुका पुढे गेल्या म्हणून निवांत झालेल्यांना आता पुन्हा धावपळ करावी लागणार आहे.