सोलापुरात श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप
सोलापूर : पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार हे समाजातील घटना घडामोडी व प्रश्न जोखीम घेऊन मांडतात. पत्रकारांच्या पाल्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षेद्वारे यशाचे शिखर गाठावे,देशाची सेवा करावी, असे आवाहन मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी केले.
रविवारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शांतीसागर मंगल कार्यालयात पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर सोलापूर जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे , सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार विनोद कामतकर आदींची उपस्थिती होती.
आमदार यशवंत माने म्हणाले, पत्रकार हे समाजातील विविध प्रश्न आणि समस्या मांडतात. विकासामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पत्रकारांच्या पाल्यांनी आई-वडिलांच्या कार्याची उतराई होण्यासाठी जिद्द व चिकाटीच्या जोरावर अथक अभ्यास करावा. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदस्थ अधिकारी व्हावे. देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शालेय साहित्य वाटप, आरोग्य विमा योजना, शिष्यवृत्ती योजना, आरोग्य शिबिरे यासह विविध स्तुत्य उपक्रम राबविले जातात. पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार आ. यशवंत माने यांनी यावेळी काढले.
प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविक भाषणात संघाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा मांडला. खजिनदार विनोद कामतकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन दत्ता मोकाशी यांनी केले तर आभार सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मानले. यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार पाल्य व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पत्रकार संघाच्या उपक्रमांसाठी
सर्वतोपरी सहकार्य राहील -आ.माने*
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी राज्यातील पहिला गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत आहे ही बाब कौतुकास्पद आहे या प्रकल्पासह पत्रकार संघाच्या विविध उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही आ.यशवंत माने यांनी यावेळी दिली.
———–