लोकसभेनंतर शिंदे परिवार भाजपमध्ये जाणार प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट ; ‘वंचित’ची नजर सोलापूरच्या मुस्लिम मतांवर
सोलापूर : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या शिंदे परिवाराची चौकशी सुरू होईल आणि ते स्वतःला वाचवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केला.
अपक्ष उमेदवार अतिश मोहन बनसोडे यांना वंचित बहुजन आघाडीने सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी पुरस्कृत केले असून त्यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची सोलापुरात सभा झाली. या विराट सभेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची मत ही आमच्या सोबतच राहतील असा विश्वास व्यक्त केला परंतु मागील लोकसभा निवडणुकीत सुमारे अडीच लाख मुस्लिम मते ही काँग्रेसला मिळाली होती ती मते जर वंचित बहुजन आघाडीला मिळाली तर वंचित भाजप आणि काँग्रेसला हरवू शकतो. त्यामुळे मुस्लिम समाजाने विचारपूर्वक मतदान करावे असे सांगून काँग्रेस आणि भाजपने देशांमध्ये मुस्लिम उमेदवार का दिला नाही? असा प्रश्न उपस्थित केला.
सोलापुरातील काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश करतील असा स्पॉट करत प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये देशात आणि विदेशातील संपत्ती लपवली आहे तसेच त्यांच्यावरील गुन्ह्याचा उल्लेख त्यात नाही त्यामुळे या निवडणुकीनंतर त्यांची चौकशी सुरू होईल आणि स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना भाजप शिवाय पर्याय नाही असे आंबेडकर म्हणाले.