भाई लोग क्या करने का? उम्मीदवार देने का क्या नहीं, एमआयएमने घेतली विचारविनिमय बैठक ; काय ठरलं …
सोलापूर : सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघासाठी काँग्रेस महा विकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यात लक्षवेधी लढत होत आहे. ही लढत सरळ सरळ दोघांमध्ये असून तिसऱ्या चौथ्या उमेदवाराचे कोणीही नाव घेत नाही.
सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात आपली ताकद असलेल्या एमआयएम या पक्षाच्या भूमिकेकडे संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. मागील काही दिवसात मोर्चे माजी आमदार रमेश कदम आणि एम आय एम पक्षातील पदाधिकाऱ्यांची भेट झाली होती कदम यांनी एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त करण्यात आली. रमेश कदम यांनी मात्र याबाबत स्पष्टीकरण देताना सोलापूर लोकसभेसाठी इंटरेस्ट दाखवला नाही.
दरम्यान एम आय एम पक्षाचा उमेदवार द्यायचा की नाही यासाठी शाब्दी यांनी आपल्या विमानतळ जवळील निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत बराच वेळ चर्चा झाली 50% कार्यकर्त्यांनी उमेदवार दिलाच पाहिजे, त्याशिवाय सोलापुरात एमआयएम पक्षाची ताकद दिसणार नाही आणि आपल्याला कोणी गृहीत धरणार नाही अशी भूमिका मांडली तर 50 टक्के कार्यकर्त्यांनी एकूणच देशातील परिस्थिती पाहता उमेदवारी देऊ नये आपला उमेदवार दिला तर त्याचा फायदा भाजपला होईल, आता उमेदवार न दिल्यास भविष्यात विधानसभेला आपल्याला फायदा होईल असेही सांगण्यात आले.
अध्यक्ष फारुख शाब्दि यांनी एकूणच सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन याबाबत प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या कानावर घालून निर्णय कळवला जाईल असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पक्षाचे काही ठराविक कार्यकर्ते पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत आहेत आणि त्यांना अध्यक्ष फारुक शाब्दि यांची साथ मिळत आहे असा आरोप करत जनरल सेक्रेटरी कोमारो सय्यद यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता आणि सोलापूर लोकसभेसाठी एमआयएम पक्षाने उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली होती.