प्रणिती शिंदे यांनी घेतली महादेव कोगनुरे यांची भेट ; कोगनुरे समर्थकांची गर्दी पाहून प्रणितीताई झाल्या अवाक्
सोलापूर : सोलापुरात सामाजिक कार्यात अग्रेसर मानले जाणारे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंट कंपनीचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनुरे यांची काँग्रेस महा विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी काँग्रेस प्रवक्ते प्राध्यापक अशोक निम्बर्गी उपस्थित होते.
प्रणिती शिंदे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कोगनुरे परिवाराने आमदार प्रणिती शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी महादेव कोगनुरे यांचे असंख्य समर्थक प्रणिती ताईंच्या स्वागताला उपस्थित असल्याचे पाहून त्या सुद्धा अवाक् झाल्या.
महादेव कोगणुरे हे दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतात, दक्षिण सोलापूर तालुक्यातील जळीतग्रस्तांच्या मदतीला ते कायम धावून जातात, त्या लोकांचे तारणहार अशी ओळख त्यांची झाली आहे तसेच पाच हजार महिलांचा हळदी कुंकवाचा मोठा कार्यक्रम घेतला, याचबरोबर हजारो शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावा घेतला, स्वतःच्या मुलाचा वाढदिवस थाटात साजरा करण्याऐवजी अनाथ आश्रममधील विद्यार्थ्यांसोबत हा वाढदिवस साजरा करून समाजासमोर त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांनी या सर्वच सामाजिक कार्याचे कौतुक करताना अशी व्यक्ती निश्चितच राजकारणात यावीत अशी अपेक्षा कोगनुरे यांच्यासमोर बोलून दाखवली. महादेव कोगनुरे हे लिंगायत समाजातील सामाजिक कार्यकर्ते आहेत, एकूणच त्यांचे सामाजिक कार्य पाहता ते दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे बोलले जाते.