सोलापुरात क्रांतीसुर्यास महाविकास आघाडीचे अभिवादन ; प्रणिती शिंदे यांनी केले फुले यांच्या कार्यास वंदन
सोलापूर शहर काँग्रेस वतीने स्त्री शिक्षणाचे जनक थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, महात्मा फुले हे एक थोर सामाजिक कार्यकर्ते, थोर विचारवंत, समाजसुधारक आणि लेखक होते. त्यांनी सामाजिक प्रबोधन, जातिव्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्री शिक्षण अशी समाजाला विकासाची दिशा देणारी विधायक कामे केली आहेत.
महात्मा फुले यांनी बहुजन समाजाचा उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिळवणुकीला वाचा फोडली. तसेच सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सामाजिक गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला, त्यांचे कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे विचारही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा गौरव करत शहरात एक पूर्णाकृती पुतळा उभारून फुले यांच्या कार्याला साजेशे असे स्मारक निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला.
यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर नलीनी चंदेले, माजी मनोज यलगुलवार, विनोद भोसले, शंकर पाटील, तिरुपती परकीपंडला, पंडित सातपुते, अनंत म्हेत्रे, भीमाशंकर टेकाळे, दिगंबर मेटकरी, गोवर्धन सुंचू, सूर्यकांत शेरखाने, राहुल बोळकोटे, व्ही डी गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थिlत होते.