सहायक अभियंत्यासह दोघांना ३ वर्षांचा सश्रम कारावास ; पाच हजाराची घेतली होती लाच
सोलापूर : २०१० च्या कोटेशन प्रमाणे शेतात ०३ पोल उभे करून विद्युत तारा ओढून देण्यासाठी ०५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप सिद्ध झाल्याने एसीबीचे विशेष न्यायाधीश न्यायाधिश योगेश राणे, यांनी तत्कालीन सहाय्यक अभियंता राचण्णा महादेवप्पा पाटील व खाजगी इराम चाँदसाब पठाण यांना प्रत्येकी ३ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रूपयांचा दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा तडवळ तालुका अक्कलकोट येथील सहाय्यक अभियंता राचण्णा महादेवप्पा पाटील (रा. ए २७ मंत्री चंडक नगर, रुपाभवानी मंदीराजवळ, भवानी पेठ, सोलापूर) यांनी विद्युत पुरवठा मागणी अर्जानुसार शेतात विजेचे ०३ खांब उभे करून तारा ओढून देण्यासाठी ०५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यावरून तक्रारदाराने अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर या कार्यालयाकडे संपर्क साधला असता आलेल्या तक्रारीची पडताळणी करून, अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूरकडून लाचेचा सापळा लावण्यात आला होता. त्यामध्ये राचण्णा महादेवप्पा पाटील, सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, शाखा तडवळ व खाजगी इसम चाँदसाब बाबू पठाण (रा. पानमंगरुळ ता. अक्कलकोट) यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा कारवाई मध्ये तत्कालीन सापळा पथकाने रंगेहाथ पकडले होते.
त्यानुसार सहाय्यक अभियंता राचण्णा महादेवप्पा पाटील व खाजगी इसम चाँदसाब बाबू पठाण यांच्याविरूध्द अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७,१२, १३(१) (ड) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस उपअधीक्षक गणेश जवादवाड (अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर) यांनी करून राचण्णा पाटील व चॉदसाब पठाण यांच्याविरूध्द विशेष न्यायालय, सोलापूर येथे दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश (एसीबी), (सोलापूर) योगेश राणे यांच्या कोर्टात सुनावणी होऊन आरोपी लोकसेवक राचण्णा पाटील व चाँदसाब पठाण, यांना वरील गुन्ह्यात दोषी धरुन त्यांना भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७,१२, १३(१) (ड) सह १३ (२) अन्वये प्रत्येकी ३ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली.
या सुनावणीत सरकारतर्फे सदर खटल्यात अॅड. माधुरी देशपांडे तर आरोपीतर्फे अॅड. निलेश जोशी यांनी काम पाहिले. अॅन्टी करप्शन तर्फे कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पो. नि. चंद्रकांत कोळी व कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून सहा. पोलीस उपनिरीक्षक सायबण्णा कोळी, पोना/ नरोटे यांनी काम पाहिले आहे.