सोलापूर – कर्नाटक राज्यात हिजाबच्या नावे मुस्लिम विद्यार्थिनींवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक शासनाचा कडक निषेध करताना माजी आमदार नरसय्या आडम मास्तर म्हणाले की, भाजप, रास्व संघ आणि हिंदुत्ववादी राजकीय पक्ष महाराष्ट्रात करू पाहात आहेत. महाराष्ट्र शासनाने मुस्लिम विद्यार्थिनींचा हिजाबसारख्या प्रकरणावरून सामाजिक छळ होणार नाही, येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची हमी घेतली पाहिजे. हिजाब घेणाऱ्या फातिमा शेख यांच्या साह्याने डोक्यावर पदर घेतलेल्या सावित्रीबाई फुल्यांनी महाराष्ट्रात सर्व जातीधर्मांच्या मुलींच्या शिक्षणाचा पाया घातला. या परंपरेला चूड लावू पाहणाऱ्या समाजविघातक मनुवादी प्रवृत्तींचा महाराष्ट्र शासनाने कडक बंदोबस्त करावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.
मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घेऊन वर्गात बसणे हा त्यांचा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक अधिकार आहे. भाजपशासित कर्नाटक राज्यात समाजात धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणण्यासाठी विद्यार्थिनींवर हिजाबबंदी घातली जात आहे. विविध समाजात वेगवेगळ्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरा आहेत. ते समाज सार्वजनिक जीवनात त्यांचे पालन करत असतात. त्यामुळे दुसऱ्या परंपरा मानणाऱ्यांवर कसलाही अन्याय होत नाही. मुस्लिमांना आधुनिक शिक्षणव्यस्थेतून बहिष्कृत करून रास्व संघ आणि भाजप मनुवादी विचारसरणीचा अवलंब करत मुस्लिमांना नवे अस्पृश्य बनवू पहात आहेत. हे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. मुस्लिम विद्यार्थिनींनी डोक्यावर हिजाब घेतल्याने वा शीख विद्यार्थ्यांनी डोक्यावर त्यांची पगडी घातल्याने शिक्षणात व्यत्यय येत नाही. त्यामुळे ठरवलेल्या मुख्य गणवेशाला बाधा येत नाही. एखाद्या विद्यार्थ्यास शेंडी ठेवून अथवा विद्यार्थिनीस कपाळावर कुंकू लावून वर्गात जायचे असेल तरी त्याला कुणाचा आक्षेप असायचे कारण नाही. तोच न्याय हिजाबबाबत लावला पाहिजे.
कर्नाटकात पुरूष विद्यार्थ्यांना मुस्लिम विद्यार्थिनींच्याविरुद्ध हिंसक चिथावणी दिली जात आहे. मुस्लिम मुलींना संरक्षण देऊ न शकणाऱ्या कर्नाटकच्या भाजप शासनाचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटी तीव्र निषेध करत आहे. राज्यकर्ता पक्षच तेथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे, ही चिंतेची बाब आहे.
लॉकडाऊमुळे गोरगरिबांच्या शिक्षणात विघ्न आले, त्यानंतर रास्व संघ विचाराच्या कुणा तथाकथित ’हिंदुस्तानी भावाने’ विद्यार्थ्यांना चिथावण्याचा प्रयत्न करून बहुजनवर्गातील विद्यार्थ्यांची दिशाभूल केली. महाराष्ट्रातील तरूणांची मने दूषित करणाऱ्यांच्या कारवाया शिवाजी महाराज, म. फुले, शाहू महाराज, महर्षि वि. रा. शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही.
हिजाबच्या नावे मुस्लिम विद्यार्थिनींवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा जळजळीत निषेध ! व धर्मांध ध्रुवीकरणा च्या विरोधात धर्मनिरपेक्ष जनता एक व्हा अशी हाक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देत असून गुरुवार दिनांक 10 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता मा.जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व माकप जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आले.
यावेळी शहापूर चाळ येथून तिरंगा झेंडा घेऊन मोर्चा निघाला तो सहस्रर्जुन मंगल कार्यालय मार्गे यशोधरा हॉस्पिटल येथून पूनम गेट येथे मोर्चा दाखल झाला. यानंतर आडम मास्तर यांनी पक्षाची भूमिका मांडले.पोलिसांनी आडम मास्तर यांच्या सह शेकडो महिला व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सदर निदर्शने कार्यक्रमात नगरसेविका कामीनीताई आडम,नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख,युसूफ मेजर,व्यंकटेश कोंगारी,सुनंदा बल्ला, सिध्दप्पा कलशेट्टी,शेवंता देशमुख, शकुंतला पानिभाते,फातिमा बेग, विक्रम कलबुर्गी,अनिल वासम,दाऊद शेख,अकील शेख,विल्यम ससाणे, नरेश दुगाने, मुरलीधर सुंचू,बापू कोकणे,दीपक निकबे, बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे,दत्ता चव्हाण, इलियास सिद्दीकी, सनी शेट्टी,बजरंग गायकवाड, नितीन कोळेकर,भारत पाथरुट, जावेद सगरी,जुबेर सगरी, शहाबुद्दीन शेख,युसूफ चाचा,लिंगवा सोलापूरे,आरिफ मणियार, मोहन कोक्कुल,बालाजी गुंडे अमोल काशीद,राजेश काशीद, लता तुळजापूरकर,अफसर शेख आदींसह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.















