सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला गुरुवारी सकाळी दणका दिला आहे. यापूर्वी बदली झालेल्या पाच कर्मचार्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचा आदेश दिला आहे.
प्राथमिक शिक्षण विभागातील जगताप, कोमारी, समदुरले ,मस्के ,श्रीमती शेख या पाच जणांना शिक्षण विभागाने गुरुवारी सकाळी कार्यमुक्त केले आहे. आता सिईओ स्वामी यांच्या रडारवर अक्कलकोट तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे असल्याची माहिती मिळत आहे. स्वामी हे भांजे यांची संपूर्ण माहिती मागविणार असल्याचे समजले.
शिक्षण विभागांमध्ये एकाच टेबलवर तब्बल दहा वर्षाहून अधिक काळ विस्ताराधिकारी म्हणून काम करणाऱ्या भांजे यांच्या कारनाम्यांची चर्चा सध्या जिल्हा परिषदेसह अक्कलकोट तालुक्यात जोरदार सुरू आहे.
शाळा तपासणी आणि शाळेच्या मान्यता हे काम भांजे यांच्याकडे असल्याने त्यांनी बरीच ‘माया’ जमवल्याची चर्चा शिक्षण विभागातून ऐकण्यास मिळते. जर प्राथमिक शिक्षण विभागातील पाच कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीचा आदेश निघत असेल तर भांजे यांचा का नाही. त्यांना नेमक्या कोणत्या स्वामींचा आशीर्वाद आहे असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील निलंबित मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमणी यांच्या प्रकरणा नंतर अशोक भांजे यांचे एक-एक प्रकरण समोर येऊ लागले आहेत. मुळात कट्टीमणी यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तत्कालीन शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड आणि अशोक भांजे यांना समोर बोलावून तात्काळ कट्टीमनी यांची ऑर्डर काढण्याचे आदेश दिले मात्र या आदेशाला भांजे यांनी राठोड यांच्याशी हातमिळवणी करून कचऱ्याची टोपली दाखवली.
त्यामुळे सिईओ स्वामी भांजे यांच्यावर चिडून आहेत. भांजे यांच्या कारनामे यांच्या बातम्या येऊ लागल्याने मागील काही दिवसापासून अक्कलकोट पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयात रोज भांजे हजेरी लावत असल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली. या प्रकरणात माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांच्याकडून ही भांजे यांना माध्यमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी पदावरून कार्यामुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली.

















