सोलापूर:-इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा शुल्कांत वाढ झाल्याचे तसेच जि.प.सेस फंडातील अपुरी तरतुदीचे कारण पुढे करत परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांकडून अकारणीबाबत शिक्षण विभागाने कळविल्याने ग्रामीण भागातील गरीब,होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. ही बाब विचारात घेऊन दरवर्षीप्रमाणे जि.प.सेस फंडातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे सरसकट परीक्षा शुल्क पूर्वीप्रमाणे भरण्याची मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आनिरुद्ध कांबळे , शिक्षण समिती सभापती दिलीपराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी केली आहे .
शिष्यवृत्ती परीक्षा ह्या स्पर्धा परीक्षेचा पाया असून शिष्यवृत्ती परिक्षेमुळे राज्य लोकसेवा आयोग,केंद्रीय लोक सेवा आयोगातील गुणवत्तेत ग्रामीण भागातील टक्का सातत्याने वाढत आहे. शिक्षणाधिकारी डाॕ.किरण लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्ती परीक्षेतील कामगिरी उंचावण्यासाठी नुकतेच शिष्यवृत्ती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते .मात्र शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क पालकांना भरावे लागणार असल्याने विद्यार्थी संख्या तसेच गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.
जि.प.सेस फ़ंडामध्ये वाढीव तरतूद करून सरसकट सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्याची मागणी केल्याचे जिल्हासरचिटणीस अमोगसिद्ध कोळी यांनी सांगितले. यावेळी शिक्षक नेते सुरेश पवार, बसवराज गुरव, दयानंद चव्हाण इ. पदाधिकारी उपस्थित होते .
संभ्रम कायम
शिक्षण विभागामार्फत जि.प.सेस फंडातील रक्कमेच्या अधीन राहून तालुकानिहाय विद्यार्थी संख्या कळविण्यात आलेली आहे.परंतु प्रत्येक शाळानिहाय व प्रवर्गनिहाय किती विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणेबाबत कळविण्यात आलेले नसल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे.
















