शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची येत्या २३ जानेवारी रोजी ९६ वी जयंती आहे. त्यानिमित्त कार्यक्रमांच्या आयोजनासंदर्भात शिवसेना सोलापूर शहर-जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, विरोधी पक्षनेता अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे, अमर पाटील, शंकर चौगुले, विष्णू कारमपुरी, संतोष पाटील, तालुकाप्रमुख संजय देशमुख, योगीराज पाटील, नगरसेवक उमेश गायकवाड, भारतसिंग बडुरवाले, परिवहन समितीचे तुकाराम मस्के, विजय पुकाळे, विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, तुषार आवताडे, वैद्यकिय सहायता कक्षाचे अतुल भंवर, रिक्षासेनेचे सुरेश जगताप, महेश धाराशिवकर, निरंजन बोध्दुल आदी उपस्थित होते.
प्रत्येक चौका-चौकात व वाड्या-वस्त्यांवर शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा लावून अभिवादन केले जावे अशी अपेक्षा व्यक्त करत पुरुषोत्तम बरडे म्हणाले की, सागरातून एखादा थेंब गेल्याने, सागराला काही फरक पडत नसतो. आज जे शिवसैनिक सोबत आहेत, त्यांना घेऊन आपल्याला आगामी महानगरपालिकेची निवडणूक एकजुटीने लढवायची आहे. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सामुदायिक नेतृत्वाखाली किमान ३० ते ३५ शिवसेनेचे नगरसेवक निवडून येणारच आहेत. सोलापूर महानगरपालिकेवर भगवा फडकवणारच अशी शपथ घेऊन आजपासूनच शिवसैनिकांनी कामाला लागण्याची आवश्यकता आहे.
याप्रसंगी बोलताना गणेश वानकर म्हणाले की, एक लाख शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ जयंतीदिनी करणार असून प्रत्येक गावात शिवसेनेचा फलक लावण्याचा संकल्प आहे.
जो शिवसैनिक सर्वोत्तम कार्यक्रमांनी जयंती साजरी करेल, त्याला ‘बाळासाहेबांचा आदर्श शिवसैनिक’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात यावे अशी अपेक्षा विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांनी व्यक्त केली. प्रत्येक शिवसैनिकाच्या कार्यक्रमाचा डाटा मागवून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवेळी हा पुरस्कार वितरीत करण्याचा निर्णय बैठकीत झाला. प्रभाग क्र. २३ मध्ये नगरसेवक उमेश गायकवाड व लक्ष्मण जाधव यांच्या निधीतून ६० लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. शिवसेनाप्रमुखांच्या नियोजित स्मारकास्थळी १०१ महिलांना साड्या वाटप करणार असल्याचे शंकर चौगुले यांनी सांगितले. प्रभाग क्र १९ मध्ये गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी मोफत कॕलिग्राफी व रांगोळी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन केलं असून शहरातील काही नुतन पदाधिकाऱ्यांना त्या दिवशी नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. तुकाराम मस्के यांच्यावतीने १०१ ब्लँकेट व फराळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. रिक्षा सेनेच्या वतीने नेत्र तपासणी शिबीर तर विद्यार्थी सेनेच्यावतीने विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन गोरविण्यात येणार आहे. अक्कलकोट वा दक्षिण सोलापूर मध्ये धान्य वाटप, साड्या वाटप, वृक्षारोपण आदी कार्यक्रम व अभिवादन केले जाणार आहे. याशिवाय रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, रुग्णांना खाऊ वाटप, गरजूंना ब्लँकेट-चादर वाटप, क्रिकेट स्पर्धा, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी अशा विविध स्पर्धा व कार्यशाळा आयोजन, अशा समाजोपयोगी कार्यक्रमांनी शिवसेनाप्रमुखांची जयंती साजरी केली जाणार आहे. या बैठकीस उपशहरप्रमुख रवी कांबळे, सोमनाथ शाहू शिंदे, संजय साळुंखे, चंद्रकांत मानवी, विभागप्रमुख शिवा ढोकळे, संतोष घोडके, रोहित तडवळकर, श्रीकांत कोकीटकर आदी उपस्थित होते.
*ग्रामपंचायत निकालाबद्दल केले अभिनंदन*
सोलापूर जिल्ह्यातून यंदा शिवसेनेचे सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातून तब्बल २८२ ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याबद्दल उपजिल्हाप्रमुख अमर पाटील व तालुकाप्रमुख योगीराज पाटील आणि अक्कलकोट तालुक्यातून जवळपास शंभर ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याबद्दल तालुकाप्रमुख संजय देशमुख यांचे तसेच मोहोळ व उत्तर तालुक्यातील घवघवीत यशाबद्दल गणेश वानकर यांचे यावेळी पुरुषोत्तम बरडे यांनी अभिनंदन केले.