जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील बारा सेतू सुविधा केंद्रासाठी दोन ठेकेदारांची निवड केली आहे. यासाठी गुजरात इन्फोटेक व टेरा इन्फोटेक, हैदराबाद या दोन्ही संस्थांची निवड करण्यात आली असून त्यांना प्रत्येकी सहा सेतू सुविधा केंद्राचा ठेका देण्यात आला आहे.
यापूर्वी सोलापूर शहरातील सेतू सुविधा केंद्राचा ठेका असलेल्या गुजरात इन्फोटेक या संस्थेची निवड ग्रामीण सेतू सुविधा केंद्रासाठी करण्यात आली आहे. अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मंद्रुप, माढा, बार्शी या सहा ठिकाणच्या सेतू सुविधा केंद्राचा ठेका हैदराबादच्या टेरा इन्फोटेक संस्थेला देण्यात आला आहे. यात सोलापूर शहरातील सेतू सुविधा केंद्राचा समावेश आहे. पंढरपूर, मोहोळ, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, करमाळा या सहा तालुक्यातील सेतू सुविधा केंद्राचा ठेका गुजरात इन्फोटेक या संस्थेकडे देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिलेल्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी शुक्रवारी दोन्ही ठेकेदारांच्या निवडीचे आदेश काढले. ठेकेदारांना अनामत रक्कम व सुविधा केंद्रात आवश्यक यंत्रणा निर्माण करण्यासाठी एक महिन्याची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यातच सेतू सुविधा केंद्र सुरु होणार आहे.
ज्या ठेकेदाराचे काम असमाधानकारक असेल त्या ठेकेदाराच्या कामाचे स्थळ बदल करण्याचाही निर्णय ही जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. यामुळे सेतू ठेकेदारांकडून पारदर्शक व गतीमान कामकाज निर्माण होण्यास मदत होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी ठेकेदारांकडून दोन महिन्यापुर्वी ठेकेदारांकडून निविदा मागविल्या होत्या. यात सात ठेकेदारांनी प्रतिसाद दिला होता. तीन ठेकेदार तांत्रिक कारणामुळे अपात्र ठरले होते. तर चार ठेकेदारांपैकी दोन ठेकेदारांची गुणांकनानुसार निवड करण्यात आली आहे