सोलापूर शहरातील सलगर वस्ती व फौजदार चावडी पोलीस ठाणे हदीतील सराईत गुन्हेगार रजाक गफुर शेख, वय ४३ वर्षे रा. घर क्र. ०५, थोबडेवस्ती, देगाव रोड, सोलापूर यास एमपीडीए अधिनियम १९८१ अन्वये दि. २२/११/२०२१ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन त्यास आज रोजी स्थानबध्द केले आहे. रजाक गफुर शेख हा मागील अनेक वर्षांपासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी साथीदारासह दहशत व भिती घालून नागरीकांविरुद्ध गुन्हेगारी वर्तन केले आहे. तो स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी साथीदारासह व्यापारी व सामान्य नागरीक यांना दहशत व भिती घालून थोबडेवस्ती, दमाणी नगर, देगाव रोड, सलगरवस्ती पोलीस ठाणे मंगळवेढा रोड, जुना देगाव नाका, सलगर वाडी, हब्बू वस्ती, न्यु लक्ष्मी चाळ, सेटलमेन्ट फ्रि कॉलनी, रामवाडी, साईबाबा चौक या परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे.
या परिसरात घातक शस्त्रानिशी फिरून दुखापत करणे, घरफोडी करणे, शस्त्रानिशी फिरून हल्ला करणे, प्रतिबंधक आदेशाचा भंग करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, चोरी करणे अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणे, बेकायदेशिर हातभट्टी दारुचा व्यवसाय करणे, सरकारी नोकरावर हल्ला, मारामारी करणे, अश्लील कृत्य करणे, विनयभंग करणे आणि जबरी चोरी करणे यासारखे गंभीर गुन्हे करत असतो. अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करून रजाक गफुर शेख याने परिसरात दहशत भिती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे. अशा प्रकारे त्याने परिसरात दहशत निर्माण करून स्वतःस धोकादायक इसम म्हणून सिध्द केले आहे.
रजाक गफुर शेख याचे विरुद्ध शहरातील सलगर वस्ती व फौजदार चावडी पोलीस ठाण्यास एकूण ३७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी २०११, २०१२, २०१९ मध्ये क. १०७ फौ.प्र.सं अधिनियमानुसार, सन २००८, २००९, २०१५ मध्ये क ११० (ई) (ग) फौ.प्र.सं अधिनियमानुसार तसेच सन २००३ व २०१७ मध्ये क. ५६ (१)(अ) (ब) नुसार तडीपारची आणि सन २०१२ व २०२० मध्ये क.०३ एमपीडीए अधिनियम, १९८१ अन्वये कारावाई करण्यात आली होती. रजाक गफुर शेख याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही, पुन्हा त्याने सन २०२१ मध्ये अलीकडील काळात स्वतःची दहशत निर्माण करून त्याच्या साथीदारासह खुनाचा प्रयत्न करण्यासारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला आहे.
रजाक गफुर शेख याचे विरुध्द वेळोवेळी कार्यवाही करुनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी त्यास एमपीडीए अधिनियम १९८१ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यास आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे.


















