सोलापूर शहराच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून रक्त आणि भक्त या दोन शब्दाचा वाद सध्या जोरदार रंगला आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हा वाद उफाळला त्यांचे पिता माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या कन्येचे समर्थन केले त्यानंतर हा विषय आणखीच वाढला.
आता या वादात मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एमआयएम पक्षाने उडी घेतली आहे. आजपर्यंत या विषयांमध्ये काहीही न बोलणारे शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया स्वतः माध्यम प्रतिनिधीना पाठवली आहे. होय,आम्ही आंबेडकर भक्त असल्याचे सांगत काँग्रेस नेत्यांना चिमटे काढले आहेत.
शाब्दी म्हणाले,
सोलापूर शहरामध्ये सध्या रक्त आणि भक्त या शब्दांना घेउन वाद सुरू आहे. हा वाद ज्यांनी निर्माण केला त्या नेत्यांना वादग्रस्त वक्तव्ये करायची सवय जडली आहे. सोलापूर शहरात कधीही त्यांच्या तोंडून विकासाची भाषा येत नाही. केवळ आणि केवळ वादग्रस्त वक्तव्ये बाहेर पडतात. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत हजारो मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्यांदा नाकारले. या निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी होती. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भक्त आहोत, आमच्यामध्ये संविधानाच्या मुल्यांचे रक्त आहे म्हणूनच शेकडो आंबेडकरप्रेमींनी सन्मानीय डॉ. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना साथ दिली. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. आमचाही झाला. पण आम्ही अवामसोबत अर्थात मतदारांसोबत राहिलो. मतदारांच्या ऋणात राहून त्यांची सेवा करीत आहोत. मतदारांना दोष देत फिरलो नाही. निवडणुकीतील पराभवानंतर तुम्ही आत्मपरीक्षण करणे गरजेचे होते. पण तुम्ही लोकांना दोष देत फिरत आहात. तुमचा पराभव झाल्यामुळे सोलापूरचे वाटोळे झालेले नाही तर तुम्ही सोलापूरचे वाटोळे केले होते म्हणून तुम्हाला सोलाापूरकरांनी नाकारले ही गोष्ट तुम्ही समजून घेणे आवश्यक आहे. होय आम्ही आजही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भक्त आहोत. हमारी नसो मे आजही संविधान का खून बहता है…


















