सोलापूर : राज्यात आणि सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनाने निर्बन्ध कडक केले आहेत. रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक येतात, काम एकाचे असते सोबत येतात दोघे त्यामुळे विनाकारण गर्दी होते. वाहने पार्किंगची जागा अडून राहते, त्यामुळे आता मिनी मंत्रालय प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
जिल्हा परिषदेचे उपोषण गेट बंद केले तसेच मागील बाजूस जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे गेट सुद्धा बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता वर्दळ कमी होण्यास मदत होणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मोठा निर्णय घेत पोर्च मध्ये येणारी वाहनाची गर्दी कमी व्हावी म्हणून दर्शनी भागात गेट लावले तसेच हॉटेल पीपल्स समोर ही लोखंडी खांब लावून घेतले.
त्यामुळे कुणाचेही वाहन आत येत नाही, स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या सह सर्व अधिकारी चालत येतात, आमदार संजय मामा शिंदे, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह इतर प्रमुख लोकप्रतिनिधी वाहन बाहेर लावून चालत झेडपी मध्ये आले आहेत.
सोमवारी मात्र या शिस्तीला जिल्हा परिषद प्रशासनाने छेद दिला. सोलापूर लोकसभा खासदार डॉ जयसिद्धेश्वर स्वामी यांची जिल्हा परिषद मध्ये बैठक होणार होती, त्यांच्यासाठी गेट उघडण्यात आले त्यामुळे त्यांचे वाहन थेट पोर्चपर्यंत आणण्यात आले. तिथे पक्षनेते अण्णाराव बाराचारे यांनी स्वागत केले. प्रशासनाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, खासदार स्वामी नको म्हणत असले तरी अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांचे चरण स्पर्श केले.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या चेंबरमध्ये नंतर बैठक सुरू झाली.
खासदारांसाठी गेट का उघडले अशी माहिती गेटवर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून घेतली असता ते स्वामी महाराज आहेत त्यांना चालत पाठवले तर ते आम्हाला शाप देतील ना म्हणून आम्ही उघडले साहेब अशी माहिती त्यांनी दिली.


















