सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत सत्ता आल्यापासून भारतीय जनता पार्टी चांगलीच बदनाम झाल्याचं अनेक प्रसंगावरून दिसून आले आहे. आता पुन्हा भाजपच्या निलंबित झालेल्या उपमहापौर आणि महापौरांनी दोन वेळा सभागृहातून बाहेर काढलेल्या माजी ज्येष्ठ नगरसेवकाच्या कृत्याने भाजपची अब्रू वेशीवर टांगल्याचं चित्र सोलापूरात आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक जेष्ठ नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते, माजी सभागृहनेते सुरेश पाटील यांनी महानगरपालिकेच्या सभेत दोन वेळा गोंधळ घातल्याने आणि असंसदीय कृत्य केल्याने त्यांना महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सभागृहातून निलंबित केले.
उपमहापौर पदावर असताना महापालिकेच्या उपायुक्तांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले आणि भारतीय जनता पार्टीने पक्षातून निलंबित केलेले राजेश काळे यांनी मात्र सुरेश पाटलांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. सुरेश पाटील यांच्यावर महापालिका प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी काळे यांनी आत्मक्लेश आंदोलनातून केली आहे. दरम्यान उपमहापौरांनी ही भूमिका घेतली हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात सर्वांची डोकेदुखी झाला असून काळे यांच्या मागील बोलावता धनी कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र भाजपच्या या दोन्ही निलंबित नेत्यां मधला वाद सध्या शिगेला गेला आहे.
आपल्या 25 ते 30 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत जनहिताची कामे केली आहेत आपण आजपर्यंत भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून सामाजिक बांधिलकीतून विकासाचे राजकारण केले आहे हे भाजपसह जनतेला सर्वश्रुत आहे आपण टक्केवारीची पद्धतीला थारा न देता प्रभागातील विविध नागरी समस्या सोडवून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला आहे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवुन प्रभागातील गोरगरीब जनतेचा सर्वांगीण विकास साधला आहे आपण या पुढे ही भाजपशी प्रामाणिक व एकनिष्ठ राहून विकासाभिमुख राजकारण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली आहे.
पालिका प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि भाजप पदाधिकारी यांच्याशी आपण आपल्या राजकीय जीवनात सौजन्याने वागले आहे आपण कधीच दादागिरी दबावतंत्राचा वापर केला नाही विकासालाच प्रथम प्राधान्य दिले असून म्हणूनच जनता आपल्या पाठीशी आहे आपल्या वरील कोणत्याही प्रकारचे आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेऊ असेही सुरेश पाटील यांनी स्पष्ट केले.


















