सोलापूर – पत्नी सोबत राहत नाही म्हणून पतीने कंबर तलावात उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी पोलीस शिपाई गुणवंत जगन्नाथ अंगुले नेमणूक सदर बझार पोलिस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रवीण नंदकिशोर वाघमारे राहणार हनुमान मंदिरासमोर, विजापूर नाका झोपडपट्टी १ सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी हे रात्रगस्त घालत असताना ते कंबर तलाव येथे गेले असता एक तरुण तलावातील पाण्यात पुढे जात असताना दिसून आला. त्याला बाहेर येण्यास सांगितले असता, त्याने मला मरायचे आहे, माझी पत्नी माझ्यासोबत राहण्यास तयार नाही, म्हणून ओरडत होता. फिर्यादीने प्रवीण यांना समजावून सांगून बाहेर काढले. त्यावेळी त्याने सांगितले की, माझे पत्नीबरोबर भांडण झाले आहे. ती माझ्या सोबत राहत नसल्याने मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक लोंढे हे करीत आहेत.


















