सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा नेतृत्व विधानपरिषदेचे आमदार यांनी करावा अशी मागणी भाजप नेते संतोष पाटील यांनी केली आहे त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात नव्या चर्चेला ऊत आला आहे.
संतोष पाटील यांनी वैयक्तिक मत मांडताना सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकसंघ व नेतृत्व सरळ असल्याने भाजपचा विजय झाला.
आगामी काही महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी भारतीय जनता पार्टी कडून सर्वसमावेशक असा चेहरा म्हणून आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे पाहिले जाऊ शकते.
सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन खासदार व आठ आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यामुळे जिल्ह्यात चांगले वातावरण आहे मात्र पक्षाचे नेतृत्व अजूनही व्यवस्थित कोणाकडे नाही. आमदार विजयकुमार देशमुख हे पालकमंत्री असताना त्यांनी तेवढ्या पुरतेच जिल्ह्याकडे लक्ष दिलं मात्र सध्या जिल्ह्यात तसे पाहिले तरी कुणाचेही लक्ष नाही, सुभाष बापू ज्येष्ठ आणि ग्रामीण भागाचे माहितीगार असले तरी त्यांना जिल्ह्यात स्वीकारले जात नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे पक्षाला एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे.
आमदार प्रशांत परिचारक यांनी महाविकास आघाडीच्या नाकावर टिच्चून पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणूकीत भारतीय जनता पक्षाला विजयी केले त्यातच त्यांच्या नेतृत्वाची झलक दिसून आली. यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये पंढरपूर तालुक्यात त्यांचे एकहाती वर्चस्व राहील आहे. कारखाना चांगले चालवतात, पक्षात सर्वमान्य नेतृत्व म्हणून पाहिले जाते. त्यामुळे आमदार प्रशांत मालकांनी जिल्ह्यात लीड घ्यावा, निश्चितच सोलापूर जिल्हा परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असे मत संतोष पाटील यांनी व्यक्त केले.


















