सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघ संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून अर्ज छाननीत माजी अध्यक्ष दिलीप माने, संचालक दिपक माळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्यासह 26 जणांचे अर्ज बाद झाले. या सर्वांना तीन दिवसात विभागीय उपनिबंधक डेअरी यांच्याकडे अपिल करण्याची मुदत होती.
या 26 पैकी दहा जणांनी अपील केले आहे. जिल्हा दूध संघाला मागच्या तीन वर्षात नियमानुसार दूध पुरवठा केला नाही म्हणून हे अर्ज बाद ठरले आहेत. विशेष म्हणजे विद्यमान अध्यक्ष दिलीप माने संचालक दिपक माळी यांचा समावेश आहे. राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे दिलीप माने यांचे मित्र असून केदार हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांना भेटण्यासाठी दिलीप माने हे शासकीय विश्रामगृहावर आले होते या भेटीत या दोन्ही नेत्यांनी बराच वेळ चर्चा केली होती.
त्यामुळे दिलीप माने यांना दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या मैत्रीचा कितपत फायदा मिळतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवार आठ फेब्रुवारी रोजी या दहा जणांच्या अपिलावर विभागीय उपनिबंधक डेअरी यांच्याकडे सुनावणी होणार आहे या सुनावणीनंतर काय निकाल लागतोय याची उत्सुकता लागली आहे.
















