सोलापूर : जिल्हा नियोजन समिती कडून जिल्हा परिषदेला येणाऱ्या निधी मध्ये आमदारांना वाटा कशासाठी म्हणून झेडपीत बराच गोंधळ झाला, मोहोळ, अक्कलकोट, मंगळवेढ्याचे सदस्य आक्रमक होते. हा विषय पार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पर्यंत गेला, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी समन्वय साधत तोडगा काढला, 60/40 हा फॉर्म्युला ठरला, आमदार 40 टक्के आणि जिल्हा परिषद सदस्य 60 अशा पध्दतीने ठरले.
दरम्यान जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा गुरुवारी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांनी सुचवलेली कामे त्या कामाच्या उद्घाटनावेळी संबंधित तालुक्याचे आमदार कामाचे उद्घाटन करून मार्केट मारुन जातात मात्र त्या ठिकाणी काम मंजूर करून घेतलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना बोलावले जात नाही हा मुद्दा काही सदस्यांनी उपस्थित केला.
त्या कामाच्या उद्घाटन वेळी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने संबंधित जिल्हा परिषद सदस्यांना सुद्धा बोलावून उद्घाटन करावे असा ठराव करण्यात आला हा मुद्दा उपस्थित करण्यामागे सदस्यांमध्ये प्रामुख्याने मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन नकाते यांचा समावेश होता.
या बैठकीमध्ये कृषी सभापती अनिल मोटे यांनी शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी एक तास लाईट सुरू करण्यात येते मात्र लाईटची वेळ मध्यरात्रीची असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना अडचण होते ही वेळ दिवसाची करावी अशी मागणी मोटे यांनी केली.


















