सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये जर पशुसंवर्धन विभागाची अवस्था पाहिली तर सर्व अधिकारी व कर्मचारी जनावरं राखायला गेले का? असा प्रश्न कार्यालय पाहिल्यानंतर पडतो. मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता कार्यालय पाहिले असता एक शिपाई व क्लार्क सोडला तर कुणीच नव्हते, पशुसंवर्धन अधिकारी डॉ नवनाथ नरळे हे टेबलावर नव्हते, शेजारी बसून संपूर्ण कार्यालय चालवणारे पशुसंवर्धन विकास अधिकारी(तांत्रिक)डॉ बोरकर यांची खुर्ची पण रिकामी होती.
चौकशी केली असता डॉ बोरकर हे मागील अनेक दिवसांपासून कार्यालयातच आले नसल्याचे समजले, त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त पुण्याच्या वाऱ्या करत असल्याचे समोर आले, विशेष म्हणजे कोणतीही रजा न टाकता ते कार्यालय सोडून फिरत आहेत अशी माहिती मिळत आहे.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ नरळे यांच्या अपघाताचा चांगलाच फायदा बोरकर यांनी घेतला, प्रभारी चार्ज असताना परस्पर जिल्हा अंतर्गत बदल्या केल्याची ही चर्चा जिल्हा परिषदेत आहे. पशुसंवर्धन विभागातील औषध खरेदी बोरकर यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली असून खरेदी होई पर्यंत ते कार्यालयात इमानदारीने काम करतात नंतर कार्यालयात त्यांचे लक्ष नसते यापूर्वीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर दैवज्ञ यांच्या काळात ही बोरकर यांनी चांगलाच फायदा घेतल्याची चर्चा आहे.
दोन्ही पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना जाळ्यात घेऊन पुण्यामध्ये बोरकर यांनी मोठा बंगला घेतल्याची चर्चा झेडपी मध्ये असून अशा अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालते असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
















