सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षानंतर अभियंता दिन साजरा झाला. कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता दिनकर महिंद्रकर यांनी या कार्यक्रमाचे अतीशय सुंदर नियोजन केले होते. सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र खराडे यांनी केले. ते स्वतः जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता असताना ही आपल्या भाषणात त्यांनी बांधकाम विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांचा माझे गुरू म्हणून उल्लेख केला. त्याच वेळी उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू तर आलेच पण गुरू हा शब्द ऐकून संतोष कुलकर्णी यांनी खराडे यांच्याकडे पाहून हात जोडले..
संतोष कुलकर्णी यांनी आपले जोरदार भाषण केले, माहिती आणि ज्ञान यातील फरक सांगितला, भारतरत्न सर विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम यांच्या कार्यकर्तृत्वाची सविस्तर अशी माहिती दिली. यावेळी अभियंत्यावर एक कविता सादर केल्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.