सोलापूर : माढा तालुक्यातील कुर्डु येथे हर घर नल से जल या योजनेअंतर्गत गावातील वाड्या वस्त्या वगळून प्रसिद्ध केलेली ई निविदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन जगताप हे आंदोलन करीत आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, आपल्या कार्यालयामार्फत केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या हर घर नल से जल या योजनेतून ग्रामीण भागातील योजना राबविण्यासाठी मौजे कुर्डु गावामध्ये आपले कार्यालयाकडील अधिकारी, गावातील पुढारी व ठेकेदाराच्या संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी सर्व्हे करुन जेथे पाणीची सोय आहे, तेथेच पुनःश्च नळाद्वारे पाणी पुरवठा देण्याची निविदा काढून शासनाची व प्रशासनाची दिशाभूल करून मोठा भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने वाडया – वस्त्या वगळून चुकीच्या पध्दतीने सर्व्हे करुन ई-निविदा प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
त्यामुळे ज्या वाडया वस्त्यांना पाण्याची आवश्यकता आहे त्यांना जल जीवन योजना हर घर नल से जल या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे झालेली ई- निविदा रद्द करुन फेर सर्व्हे करुन वाड्या वस्त्याचा समावेश करुन पुन:श्च एकदा लापूर/ नव्याने ई-निविदा प्रसिध्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.



















