सोलापूर : सोलापूरच्या राजकारणात मागील चार वर्षात पालकमंत्री बदलाचीच जास्त चर्चा राहिली. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्याला आता पाचवे पालकमंत्री म्हणून येत आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड नंतर दत्तात्रय भरणे, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आता चंद्रकांत पाटील चार वर्षात पाच पालकमंत्री लाभले आहेत.
तब्बल दोन वर्ष दत्तात्रय भरणे यांची मामागिरी दिसून आली. त्यानंतर पालकमंत्री झालेले राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हा नियोजन समितीच्या याद्यांची संपूर्ण जबाबदारी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे दिली. त्यामुळे कल्याणशेट्टी यांची नियोजनात दादागिरी चालली.
विखे पाटील पालकमंत्री झाल्याने भाजपमधील मालक नाराज दिसून आले. पालकमंत्र्याच्या दौऱ्यात ते कधीच दिसले नाहीत. आता मात्र पालकमंत्री बदलले आहेत. चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री झाल्याने सोलापूरच्या मालक गटात आनंदाचे वातावरण असल्याचे ऐकण्यास मिळते.
सोलापुरातील चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत मानले जाणारे मोहन डांगरे यांचे आता राजकीय व प्रशासकीय पातळीवर वजन वाढणार असल्याची चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळते. चंद्रकांतदादांचे ते शब्द “अरे मोहन” हे आता कायमच कानावर पडतील.
जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषदेच्या याद्यांचे नियोजन आता कुठल्या नेत्याच्या हाती येणार असा प्रश्न राजकीय वर्तुळातून ऐकण्यास मिळतो. यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व जबाबदारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर दिली होती परंतु आता चंद्रकांत पाटील हे ही जबाबदारी कोणावर सोपवणार अशी चर्चा सुरू आहे. पुन्हा कल्याणशेट्टी यांचाच दबदबा राहणार का? का ही जबाबदारी मालक गटाकडे जाते हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.