सोलापूर : जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना सोलापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने यंदाचा ईद-ए-मिलाद हा सण 28 सप्टेंबर ऐवजी 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे मंगळवारी झालेल्या जिल्हास्तरीय शांतता कमिटीच्या बैठकीत हा एकमुखी निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी स्वागत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते सरपंच पोलीस पाटील यांच्यासह जिल्ह्यातून विविध समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला मुस्लिम समाजातील मान्यवरांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही यंदाचा ईद-ए-मिलाद सण 28 सप्टेंबर ऐवजी 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. मुस्लिम समाजाने घेतलेल्या या निर्णयाचे इतर समाजातील मान्यवरांनीही तितक्याच कौतुकाने स्वागत केले.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या निर्णयाचे मी अभिनंदन करतो. एक चांगले पाऊल त्यांनी टाकले आहे. मी गणेश विसर्जन मिरवणुकी सोबत ईद-ए-मिलाद च्या कार्यक्रमात ही सहभाग नोंदवेन. गणेश विसर्जन दिवशी आणि ईद-एलाच्या दिवशी मी सोलापूर जिल्ह्यात दारूबंदीचा आदेश निर्गमित करतो. असे सांगतानाच सोलापूर जिल्हा शांतताप्रिय आहे ती संस्कृती कायम ठेवा, जिल्ह्यातील प्रत्येक सण असा साजरा करा की तुमची मित्रता वर्षभर कायम टिकेल.
यावेळी विविध सूचनाही करण्यात आल्या. यामध्ये ईद-ए-मिलाद सणाच्या दिवशी दारूबंदी करावे, गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकी दरम्यान अश्लील गाण्यावर बंदी घालावी, डॉल्बी वाजवताना पोलिसांनी डेसिबल नियमाचे सक्त पालन करावे, पारंपारिक वाद्य वाजवून जे मंडळ शांततेत मिरवणूक काढेल त्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करावा, मिरवणुकी दरम्यान गुलालाची उधळण कमी करावी, प्रत्येक मंडळांनी किमान दहा ठिकाणी वृक्षारोपण करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी केले, सूत्रसंचालन व आभार उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी मानले.