सोलापूर : संपूर्ण भारत देश सध्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षांनिमित्त आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. विविध क्षेत्रात वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर राबवले जात आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कार्यक्रम सुरू आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या संकल्पनेतून येणाऱ्या 1 जानेवारी 2022 रोजी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व ग्रामपंचायत मध्ये एकाच वेळी 75 हजार विद्यार्थी राष्ट्रगीत गाणार आहेत.
हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता होईल. इयत्ता पाचवीच्या पुढील विद्यार्थ्यांच्या समावेश असणार आहे. हा कार्यक्रम सोशल मीडियावर लाईव्ह करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले. शाळेत रोजच राष्ट्रगीत होते मात्र या कार्यक्रमाला गावाची संसद म्हणून ग्रामपंचायत निवडण्यात आली आहे, ग्रामसेवक, आरोग्य सहाय्यक, तलाठी, कृषी सहाय्यक त्या गावातील जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी यांचा समावेश त्या दिवशी राहणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी दिली.

















