सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त होऊन त्याचा जवळपास चार महिने झाले आहेत. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकदे यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा सचिव असतो त्यामुळे या पदाला प्रचंड महत्त्व आहे. या पदासाठी सध्या अधिकाऱ्यांमध्ये लॉगिन सुरू असल्याची माहिती मिळत आहे या पदावर येण्यासाठी किमान 12 अधिकारी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
यामध्ये यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत विभागाला काम केलेल्या मनीषा देसाई, पाणी व स्वच्छता विभागाला प्रकल्प अधिकारी म्हणून काम केलेल्या स्मिता पाटील, दक्षिण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, बार्शीला यापूर्वी गटविकास अधिकारी म्हणून काम केलेले प्रदीप काळे यासह बारा जणांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेला येण्यासाठी या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या आमदार, मंत्री, पालकमंत्र्यांपर्यंत सेटिंग लावल्याची चर्चा आहे.
मात्र जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या डेप्युटी सीईओ म्हणून स्मिता पाटील यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे पती धैर्यशील पाटील हे सोलापूर जिल्ह्यात वन विभागात अधिकारी असल्याने पती-पत्नी एकत्रीकरण यानुसार त्यांची सोलापुरात ऑर्डर होईल असेही बोलले जात आहे.

















