सोलापूर : सेवा पुस्तक अद्ययावत नसेल तर सेवा निवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती वेतन मंजूरीसाठी हेलपाटे मारावे लागतात. कर्मचार्यांची ही अडचण लक्षात घेऊन सीईओ स्वामी यांनी काही महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व संवर्ग कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली होती.
सर्व संवर्गातील 14000 कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत झाल्यानंतर या सेवा पुस्तकांचे डिजिटायझेशन करून मोबाईल वर उपलब्ध करून दिल्यास सर्व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सोयीस्कर होईल अशी संकल्पना सीईओ स्वामी यांनी मांडली. त्यानुसार गेले दोन महिने ई सेवा पुस्तक मोबाईल ॲप तयार करण्याचे काम सुरू होते. हे काम आता पूर्ण झाले असून दिनांक 1 नोव्हेंबर रोजी अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते या ॲप’चा शुभारंभ होणार आहे.
यावेळी अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त सौरभ राव हे असतील. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. फक्त सेवा पुस्तक ऑनलाइन करून आम्ही थांबलो नाही तर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंडाच्या स्लीप सुध्दा या ॲप मध्ये एका क्लिकवर उपलब्ध असणार आहेत असे यावेळी प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी सांगितले. जिल्हा मुख्यालयावरुन कामकाजासंदर्भात वेळोवेळी जे संदेश दिले जातात ते संदेश ॲप द्वारे ग्राम पातळीपर्यंत काही क्षणात पोहोचणार असल्यामुळे प्रशासकीय कामकाजास गती मिळणार असल्याचे यावेपळी पाटील यांनी सांगितले.
हा उद्घाटनाचा कार्यक्रम ऑनलाईन असल्याने वेब लिंक द्वारे अपर मुख्य सचिव व विभागीय आयुक्त ऑनलाइन जॉईन होतील. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित राहणार असून त्यांना सभागृहातील स्क्रीनवर उद्घाटन झाल्याचे पाहता येणार आहे.


















